नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मानगर भागातील एका गृहिणीस तब्बल साडे सहा लाख रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. खोटे काम देवून महिलेस वेगवेगळया बँक खात्यात ही रक्कम ऑॅनलाईन भरण्यास भाग पाडले असून याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मानगर भागातील ३४ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पार्ट टाईम काम करून संसारास हातभार लावावा या हेतूने महिला इंटरनेटवर घरगुती पार्ट टाईम कामाचा शोध घेत होती. टेलिग्रामवरील मनी मेक सिंम्पल या ग्रुपच्या माध्यमातून ती शोध घेत असतांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात भामट्यांनी तिच्याशी संपर्क साधला.
यावेळी त्यांनी विविध घरगुती कामाची माहिती देत त्यांनी काम देण्याचे आमिष दाखविले. महिलेचा विश्वास संपादन करून काही रक्कम बँक खात्यावर टाकण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला खोटे काम मिळवून देण्यात आल्याचे भासविण्यात येवून विविध बँक खात्यावर पैसे टाकण्यास भाग पाडले.
गेल्या वीस बाविस दिवसात महिलेने तब्बल ६ लाख ४० हजार ५४० रूपयांची रक्कम संशयिताच्या खात्यावर टाकली असून, कामाचा मोबदला न मिळाल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे करीत आहेत.