नाशिक – गिरणारे गावात प्रवासात मुलीची छेड काढणा-यांना हटकल्याने संतप्त मुजोर तरूणांनी सीटीलिंक बस वाहकाला मारहाण केल्याची घटना बसमधील सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. बसमध्ये चढत असतांना दोघांनी एका मुलीची छेड काढली. मुलीची छेड काढत असल्याचे चालक आणि वाहकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या टवाळखोरांना हटकत मुलीस बसमध्ये बसण्यास सांगितले. गाडीत सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे काही होणार नाही असा धीर त्यांनी मुलीस दिला. पण, संतप्त झालेल्या दोघा मुजोरांनी थेट चालकास तू मध्ये का पडला असे म्हणत वाहकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर हे दोघेही पळून गेले. हे दोन्ही तरुण गिरणारे गावातील शाळेतील असल्याचे समजते. या घटनेनंतर स्थानिकांनी कडक कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी केली आहे. अद्याप या घटनेची कोणतीही नोंद पोलिस स्थानकात नाही.