नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड परिसरातील वेगवेगळया भागात छापे टाकत पोलिसांनी चार बेकायदा दारू विक्री करणा-यावर धडक कारवाई केली. या कारवाईत मद्यसाठा जप्त करुन नाशिकरोड व देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नरफाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला असता एकलहरारोडवरील पत्र्याच्या शेडच्या बाजूला सनी राजेंद्र जाधव (२८ रा.गोदरेजवाडी,सिन्नरफाटा) हा युवक दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातील ४९० रूपये किमतीच्या प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलिस शिपाई दत्तात्रेय वाजे यांनी तक्रार दाखल केली आहे.
दुसरी कारवाई सामनगाव रोड भागात करण्यात आली. विकी चंदू चव्हाण (रा.पॉलिटेक्नीक कॉलेज जवळ,सामनगावरोड) हा रविवारी दुपारच्या सुमारास पॉलिटेक्नीक कॉलेज भागातील पाट किनारी एका झाडाखाली दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून देशी दारूच्या सुमारे १ हजार ४७० रूपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला. याबाबत हवालदार शंकर काळे यांनी तक्रार दाखल केली आहे.
तिसरी कारवाई चेहडी बुद्रुक येथील एकलव्यनगर भागात करण्यात आली. किशोर अशोक जाधव (रा.दारणा हॉटेल समोर,भिल्ल गल्ली,चेहडी बु.) हा रविवारी सायंकाळच्या सुमारास एकलव्यनगर येथील एका टपरीच्या आडोशाला दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून एक हजार ५४० रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस शिपाई राकेश बोडके यांनी तक्रार दाखल केली आहे. तिन्ही गुह्यांप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक पवार,ठेपणे व हवालदार काकड करीत आहेत.
चौथी कारवाई लहवित येथे करण्यात आली. शिवाजी बोराजी कुंदे (रा.कोळीवाडा,लहवित) हा कोळीवाड्यातील एका घराच्या भिंतीलगत दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे ७०० रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस नाईक भोईर यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक पाचोरे करीत आहेत.