नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड औद्योगीक वसाहतीसह सिडको भागात पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना गजाआड करुन त्यांच्या ताब्यातून तलवारीसह गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे कर्मचारी स्वप्निल जुंद्रे आणि भुषण सोनवणे यांना एक्स्लो पॉईंट भागात एक युवक पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार रविवारी सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला असता मयुर रामदास गांगुर्डे (२८ रा.सुयोग अपा.कमलस्विट समोर दातीरनगर) हा युवक पोलिसांच्या जाळय़ात अडकला. संशयिताच्या अंगझडतीत दोन काडतुसे भरलेला गावठी कट्टा मिळून आला. योगेश रघूनाथ मराठे (२८ रा.सैलानीबाबा चौक,जेलरोड) या संशयिताकडून त्याने पिस्तूल खरेदी केल्याची कबुली दिली असून पोलिस मराठेचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार विठ्ठल चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे.
दुसरी कारवाई सिडकोतील त्रिमुर्तीचौक भागात करण्यात आली. रविंद्र अंबादास मते (२९ रा.शिवा बार जवळ,त्रिमुर्तीचौक) हा युवक रविवारी रात्री आपल्या घर परिसरात दहशत माजवितांना मिळून आला. त्याच्या अंगझडतीत धारदार तलवार मिळून आली असून याप्रकरणी अंमलदार प्रविण राठोड यांनी तक्रार दाखल केली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले व हवालदार टोपले करीत आहेत.