नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाहीतांचा माहेरून पैसे आणावेत या कारणातून सासरच्या मंडळीकडून मानसिक व शारिरीक छळ होत असल्याच्या वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली तक्रार भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत राहणा-या विवाहीतेने दिली आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सन.२०१८ पासून मुस्तकिन खान, मोहम्मद खान, जेनब खान, मोहम्मद खान, अफसर खान व मोहम्मद खान (रा.सर्व दरेगाव ता.मालेगाव) आदी सासरच्या मंडळीने तिचा छळ केला. व्यवसायासाठी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळीने वेळोवेळी मानसिक व शारिरीक छळ करून स्त्री धन काढून घेत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे व अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
दुसरी तक्रार सातपूर औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणा-या पीडित विवाहीतेने केली आहे. या तक्रारीत आसिफ खान, मेहरून निसा, आबीद खान, आरीफ खान, आरजू खान, नगमा खान, समीम खान, मेहरबान खान व रिझवान खान आदी सासरच्या नऊ जणांनी छळ केल्याचे म्हटले आहे. घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत तसेच घरगुती कारणातून २०२० पासून तिचा छळ सुरू असून, किरकोळ गोष्टीची कुरापत काढून सासरच्या मंडळीकडून तिला वेळोवेळी मारहाण होत आहे. तसेच संशयितांनी सुमारे ४ लाख ३५ हजार ३०० रूपये किमतीचे पीडितेचे स्त्रीधन काढून घेतले असून तिच्या पतीने दुसरा विवाह केल्याने तिने पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.