नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सात सोनसाखळ्या चोरणा-या दोन चोराला शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ने गजाआड केले आहे. या जोडीने सोनसाखळ्या चोरण्यासाठी दुचाकींची चोरी केल्याचेही उघड झाले आहे. या संशयितांनी म्हसरुळ, आडगाव, मुंबईनाका, अंबड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सात जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. दोघांकडून २ लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या लगडीसह १ लाख ३० हजार रुपयांच्या दोन दुचाकी, असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, इतर दोन दुचाकींचा तपास सुरू आहे.
ओमकार नंदकिशोर बागोरे (२३, रा. अमृतधाम, पंचवटी) आणि मुसा अय्युब सैय्यद (३६, रा. आडगाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी जबरी चोरीच्या सात गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. यापैकी संशयित सैय्यद हा सराईत असून, दोघांनी इतर ठिकाणीही गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे. शहरात चैन स्नॅचिंगचे प्रमाण वाढल्याने पोलिस सतर्क झाले आहेत. गुन्हे शाखेतर्फे संशयितांचा माग काढण्यात येत आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना जबरी चोरी करणारे संशयित अमृतधाम परिसरात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सापळा रचण्याचे आदेश दिले. त्यानुसार अंमलदार रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, नाझिमखान पठाण, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मुक्तार शेख यांनी सापळा रचला. अमृतधाम परिसरात दोघे संशयित येताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी पंचवटी परिसरातून दुचाकी चोरी करून तिचा वापर इतर गुन्ह्यात केल्याची कबुली दिली.