नाशिक : शहरातील दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. या घरफोटीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकड चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड आणि आडगाव पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना शिदेगावात घडली. उजेश निलकंठ गवारे (रा.राजहिरा अपा.सुभाष पेट्रोल पंपामागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गवारे कुटुंबिय सोमवारी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी गॅलरीत चढून खिडकीतून हात घालून बेडरूमचा दरवाजा उघडून ही चोरी केली. बेडरूममध्ये शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सुमारे ६७ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. दुसरी घटना आडगाव शिवारातील घडली. या घरफोडीची तक्रार ईश्वर प्रदिपराव जाधव (श्रीसुक्त हेवन,निवृत्तीनगर महालक्ष्मीनगर) यांनी दिली आहे. जाधव कुटुंबिय बुधवारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कुलूप तोडून चोरी केली. घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटात ठेवलेली पाच हजार रूपयांची रोकड आणि मंगळसुत्र असा ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार भास्कर वाढवणे करीत आहेत.