नाशिक : दिंडोरीरोडवरील म्हसरूळ पोलिस ठाण्यासमोर भररस्त्यात दुचाकीस्वार तरूणीचा विनयभंग करणा-या तरुणाला पोलिसांनी गजाआड केले आहे. परिचीत असलेल्या संशयिताने पाठलाग करीत हे कृत्य केले आहे. सुशिल शिवलिंग लिमकर (२५ रा.इंद्रप्रस्थनगर,पेठरोड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदनगर येथील २४ वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे परिचीत असून त्याने मोबाईल नंबर मिळवित वेळोवेळी मोबाईलवर संदेश पाठवून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र युवती त्यास दाद देत नव्हती. बुधवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास पीडिता राहू हॉटेलकडून म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना संशयिताने तिचा पाठलाग केला. सुरक्षेच्या दृष्टीने पीडितेने पोलिस ठाणे भागात आपले वाहन थांबविले असता संशयिताने तुझ्याशी काही तरी बोलायचे आहे असे म्हणून तिचा विनयभंग केला. युवतीने आरडाओरड केल्याने संशयितास अटक करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक रमेश घडवजे करीत आहेत.