नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोडला मंगळवारी वेगवेगळया ठिकाणी राहणा-या दोन तरूणांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना चाडेगाव येथे घडली. आण्णा किरण पवार (२२ रा.चाडेगाव – कोटमगाव) या तरूणाने मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अँगलला कपड्याची दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस पाटील जनार्दन शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.
दुसरी घटना देवळाली गावात घडली. येथील यश सुनिल ठाकरे (१८ रा.कदम चाळ,भुजार गल्ली) या युवकाने मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील छताच्या लाकडाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ. दिग्वीजय पाटील यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.