नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भगूर येथील दारणा पंपिग भागात आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या २० वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार विजय वाटपडे (२० रा.जेलरोड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाटपडे हा युवक मंगळवारी (दि.४) दुपारच्या सुमारास आपल्या मित्रांसमवेत आंघोळ करण्यासाठी दारणा पंपिग भागात गेला होता. मित्रांसमवेत तो दारणा नदीपात्रात आंधोळ करीत असतांना ही घटना घडली. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. सोबत असलेल्या मुलांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केल्याने स्थानिकांनी धाव घेत त्यास पाण्याबाहेर काढले.
गंभीर अवस्थेत मित्र राहूल विराळ यांनी त्यास तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.