किरकोळ वादातून तीन जणांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण, एक जण जखमी
नाशिक : शिंदेगावात किरकोळ वादातून तीन जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. याप्रकरणी अजित मारूती काकड (रा.शिंदे ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश लालदास तुंगार,आदित्य मोहन तुंगार व हितेश तानाजी बोराडे अशी कोयत्याने हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. काकड गुरूवारी सकाळच्या सुमारास गावातील शिवाजी महाराज पुतळयाजवळ गप्पा मारत बसलेले असतांना ही घटना घडली. किरकोळ कारणातून त्यांचा संशयितांशी वाद झाला. यावेळी संतप्त झालेल्या त्रिकुटाने त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत ऋषिकेश तुंगार या संशयिताने त्यांच्या हातावर कोयत्याने तर उर्वरीत दोघांनी लोखंडी रॉडने हल्ला चढविल्याने काकड जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक घेगडमल करीत आहेत.
बांधकाम साईटवर ठेवलेले साहित्य चोरट्यांनी चोरून नेले
नाशिक : सातपूर येथील सावता माळी चौकात बांधकाम सुरू असलेल्या साईटवर ठेवलेले साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी इलेक्ट्रीकची वायर,फरशी कटर मशिन आणि दोन ग्राईंडर मशिन असा सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम बाबुराव विधाते (४८ रा.मारूती मंदिरासमोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विधाते यांचे राहत्या घराचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बाधकाम साईटवरील पार्किंगच्या मोकळ््या जागेतून व पहिल्या माळ््यावरील दरवाजा नसलेल्या उघड्या खोलीत ठेवलेली ३०० मिटर इलेक्ट्रीकची वायर,फरशी कटर मशिन आणि दोन ग्राईंडर मशिन असा सुमारे २६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.