नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील अर्चित गॅलेक्सी बांधकाम साईटवर मिनी क्रेन मधील लोखंडी फ्रेम डोक्यात पडल्याने १८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. या घटनेत अरूण पुनित मडावी (१८) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदार, इंजिनीअर आणि सुपरवायझर विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनित उत्तमराव मडावी (मुळ रा. छत्तीसगड हल्ली नवश्या गणपती सेक्टर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मडावी गेल्या शुक्रवारी (दि.३१) गंगापूररोड येथील अर्चित गॅलेक्सी या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. या घटनेत अरूण पुनित मडावी (१८) या युवकाचा मृत्यू झाला. अरूण मडावी हा शुक्रवारी आपल्या वडिलांसाठी जेवणाचा डबा घेवून बांधकाम साईटवर आला होता. इमारती खाली तो उभा असतांना वरील मजल्यावर मिनी क्रेनच्या माध्यमातून वाहतूक केली जाणारी लोखंडी फ्रेम त्याच्या डोक्यात पडली होती.
बिल्डर व त्याच्या अन्य सहका-यांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने ही घटना घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरूण मडावी याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वडिल पुनित मडावी यांच्या तक्रारीवरून बांधकाम व्यावसायीकासह ठेकेदार, इंजिनिअर आणि सुपरवायझर आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.