नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडीतील महाराष्ट्र कॉलनी भागात शहरात चैनस्नॅचरांचा पुन्हा सुळसुळाट झाला असून रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. या चोरीप्रकरणी ज्योती संजय कातकाडे (रा.ब्रम्हाणी पार्क,हिरावाडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कातकाडे या सोमवारी (दि.३) रात्रीच्यावेळी आपल्या घर परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. महाराष्ट्र कॉलनीतील अशोक वृंदावन सोसायटी समोरील कॉलनीरोडने त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मिथून परदेशी करीत आहेत.
चोरट्यांनी महिलेची पर्स उघडून मोबाईल व सोन्याचांदीचे दागिणे चोरले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहिपूल भागात खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेची पर्स उघडून मोबाईल व सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत २५ हजाराच्या ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी कविता भुषण महाजन (रा.शिवकृपानगर,हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाजन या रविवारी (दि.२) खरेदीसाठी दहिपूल भागात गेल्या होत्या. पंजाब कलेक्शन भागात त्या खरेदी करीत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून मोबाईल व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.
…….