नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून साडे सहा वर्ष तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी सातपूर पोलिस स्थानकात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने लग्नास नकार देवून धमकी दिल्याने तरुणीने पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. सचिन श्याम वाघमारे (२६ रा.मिलींदनगर,तिडके कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर २०१७ मध्ये तिची संशयिताशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होवून दोघांमध्ये प्रेमसंबध प्रस्थापित झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून विजयनगर (अंबड) व कामगारनगर (सातपूर) आदी भागात वेळोवेळी घेवून जात तरूणीवर बलात्कार केला.
या प्रेमप्रकरणास साडे सहा वर्ष उलटूनही संशयित लग्नाचा विचार करीत नसल्याने पीडितेने त्याच्याकडे तगादा लावला असता ही घटना घडली. संशयिताने लग्नास नकार देवून तुला बघून घेईल अशी धमकी दिल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.