नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाच महिन्यापूर्वी बंदुकीचा धाक दाखवून ६६ लाख रुपये लुटणा-या चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी सख्ख्या भावांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ५३ लाख रुपये व कार हस्तगत केली आहे.
चोरलेल्या या पैशांपैकी दहा लाख रुपये दोघांनीही गोवा, पुणे व मुंबईत मौजमजा करुन उडवल्याचेही समोर आले आहे. या दोघा भावापैकी मुख्य संशयित गायक असून त्याचा स्वतःचा ऑर्केस्टा असल्याची माहिती समोर आली आहे.
१५ नोव्हेंबर २०२२ ला सायंकाळी होलाराम कॉलनी येथील मनवानी बिल्डर्सचे संचालक कन्हैयालाल तेजसदास मनवाणी यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांचा कारचालक देविदास शिंदे व त्याचा भाऊ युवराज शिंदे यांनी ६६ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि कार चोरुन नेली होती. मनवानी कार्यालयातून कारने घरी जात असतांना ही लुट करण्यात आली होती.
होलाराम कॉलनीत आल्यानंतर कारचालक देविदास शिंदे याने कार थांबवली आणि कारमध्ये युवराज आला. त्याने बंदुकसदृश वस्तूचा धाक दाखवून मनवानी यांच्याकडील ६६ लाख रुपये ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनी मनवानी यांना पाथर्डी फाटा परिसरात एकटे सोडून पळ काढला होता.
या घटनेनंतर गुन्हेशाखा युनिट एकने पाच महिन्यांच्या तपासानंतर दोन सख्ख्या भावांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ५३ लाख रुपये आणि कार हस्तगत केल्याची माहिती गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.