नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुटुंबियास जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून मुख्य संशयित अद्याप फरार आहे.
हेमंत भगवान शिरोडे (२४ रा.खंडेराव मंदिरासमोर, पाथर्डी गाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, रोहित पाटेकर (२५ रा. इंदिरानगर) हा त्याचा मित्र अद्याप फरार आहे. इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत राहणा-या अल्पवयीन पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २०२१ मध्ये पीडितेची रोहित पाटेकर या संशयिताशी इन्स्टाग्राम या सोशल साईटच्या माध्यमातून ओळख झाली होती.
इन्स्टाग्रामवर चॅटींगचे थेट मैत्रीत रूपांतर झाल्याने दोघांमध्ये भेटीगाठी झाल्या. यावेळी संशयिताने मुलीस प्रथम पाथर्डी गाव परिसरातील एस.एम.लॉज येथे घेवून जात आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला.
त्यानंतरही त्याने त्र्यंबकरोड येथील आनंद व साई प्लाझा लॉज तसेच रात्रीच्या वेळी गुरूगोविंद कॉलेज समोरील सार्वजनिक रोड भागात घेवून जात बलात्कार केला. मित्राच्या मदतीने संशयिताकडून रोजचा अत्याचार वाढल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी संशयिताच्या मित्रास अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20