व्याजाने घेतलेले पैसे फेडू न शकल्याने तिघांनी महिलेला शिवीगाळ करीत केली दमदाटी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात व्याजाने घेतलेले पैसे फेडू न शकल्याने तिघांनी महिलेच्या घरात शिरून तिला शिवीगाळ करीत दमदाटी केली. या घटनेत संशयितांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बेकायदा सावकारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कविता कसबे (रा.अप्सरा बिल्डींग,नवले कॉलनी शिवाजी चौक), रूबिना शेख (रा.गोरेवाडी,ना.रोड) व निलेश बेद (रा.प्रकाशनगर जेलरोड) अशी महिलेस घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अर्चना किरण जगताप (रा. पिंपळपट्टीरोड,मोरे मळा एकता कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. जगताप यांनी संशयिताकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. मात्र गेल्या काही महिन्यात त्या अडचणीमुळे संशयितांना व्याजाची रक्कम देवू न शकल्याने ही घटना घडली. संशयित त्रिकुटाने गेल्या मंगळवारी (दि.२८) रात्री जगताप यांचे घर गाठून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक चौधरी करीत आहेत.
जुगार खेळणा-या पाच जणांवर पोलिसांनी केली कारवाई, रोकड व जुगार साहित्य जप्त
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या पाच जणांवर पोलिसांनी तिबेटिअन मार्केट भागात केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे चार हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन मनोहर गायकवाड (३२),विक्रम प्रकाश जाधव (३२ रा.दोघे लक्ष्मणनगर तेलंग वस्ती) संजय मारूती गुंजाळ (४३ रा.तुळजाभवानी नगर,आरटीओ म.बाद लिंकरोड),कविता दलाल (३५ रा.मिशनमळा) व राकेश मारिया जाधव (४५ रा.हमालवाडी,कॅनलरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत.
याप्रकरणी अंमलदार सागर चौधरी यांनी तक्रार दाखल केली आहे. तिबेटीयन मार्केटच्या मागील मिशन मळ्यात मोकळ्या जागेत काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता संशयित कल्याण नावाचा मटका जुगार खेळतांना मिळून आले. अधिक तपास पोलिस नाईक लोंढे करीत आहेत.