पार्क केलेल्या मोपेड दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी साडे चार लाख रूपयांची रोकड केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लॅमरोड भागात पार्क केलेल्या मोपेड दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी सुमारे साडे चार लाख रूपयांची रोकड लंपास केली. या चोरीप्रकरणी गोपाल ईश्वरदास किश्नानी (४६ रा.कोमल वुडस,कलानगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किश्नानी शुक्रवारी (दि.३१) बॅकेतून पैसे काढून लॅमरोड भागात गेले होते. शालिमार रेस्टॉरंट या हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली अॅक्टीव्हा दुचाकी पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची डिक्की उघडून हॅण्ड बॅग चोरून नेली. या बॅगेत चार लाख ५० हजाराची रोकड होती. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.
३२ वर्षीय इसमाने केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३२ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना अंबड औद्योगीक वसाहतीतील घरकुल योजना भागात घडली. भारत ताराचंद बागुल (रा.बिल्डींग नं.६ घरकुल योजना अंबड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बागुल यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बागुल याने बुधवारी (दि.१) दुपारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत कांताबाई बागुल यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.