नाशिक : शहरात वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड, सातपूर आणि आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या आत्महत्यामध्ये एकाने गळफास लावून घेत तर दोघांनी विषारी औषध सेवन घेतले आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. पहिल्या घटनेत शिलापूर गावातील जुगनू हॉटेल भागात विषारी औषध सेवन अनिल अंबादास बर्वे (३२ रा.माडसांगवी) या युवकाने बुधवारी दुपारच्या सुमारास आत्महत्या केली. बेशुध्द अवस्थेत तो मिळून आल्याने कुटुंबियांनी त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत. तर दुस-या घटनेत सिडकोतील बबन कचरू आव्हाड (५३ रा.उपेंद्रनगर) यांनी बुधवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील गॅलेरीच्या लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुलगा किशोर आव्हाड यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत. तिसरी घटना सातपुर गावातील शनि चौकात घडली. अनिता नंदू पुराणे (२५ रा.कोळीवाडा) या युवतीने सोमवारी (दि.१८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच भाऊ संतोष पुराणे यांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता बुधवारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.