नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन तवेरा गाडी चोरणा-या चोराला नाशिकरोड पोलिसातील गुन्हे शोध पथकाने गजाआड केले आहे.
या चोराकडून पाच लाख रुपयांची तवेरा गाडी हस्तगत करण्यात आली आहे. फैजानउद्दीन उर्फ राज फैजानउद्दीन (२७) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.
१३ मार्च रोजी शिंदेगाव येथून बाळकृष्ण शंकर सोनवणे यांची तवेरा गाडी चोरीला गेली होती. नाशिकरोड पोलिसात या बाबत गुन्हा दाखल होता. गुन्हे शोध पथकाने सदर गाडी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आधार घेऊन माहिती काढीत वाशिम जिल्ह्यातील काजळेश्वर येथून या आरोपीला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहे.
बांधकाम साहित्य चोरही अटकेत
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामनगाव येथील आनंदम सिटी या बांधकाम साईट वरून चोरीस गेलेले बांधकाम साहित्य पोलिसांनी हस्तगत करुन चोरट्यांला अटक केली आहे. विक्रांत सुनील हंडोरे (२२) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
या साईटवरुन ४५ हजार रुपये किंमतीचे ४५ लोखंडी प्लेटा, २१ लोखंडी चिमटा (सिंकजा) चोरी झाल्या होत्या. या चोरीची तक्रार मयूर दिलीप बागुल यांनी दिली होती. गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार सदर साहित्य हे रिक्षातून चोरी गेल्याचे कळाले. त्यानंतर रिक्षाचा शोध घेतला असता ही रिक्षा गोरेवाडी भागातील असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
गोरेवाडी, शास्त्री नगर येथे आरोपीला ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली रिक्षा सह बांधकाम साईट वरील लोखंडी साहित्य असा एक लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार विलास गांगुर्डे करीत आहे.