भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत ४५ वर्षीय दुचाकीस्वार ठार
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल सिग्नल जवळ भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत ४५ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित विलास पोहरकर (४५ रा.शिवकृपानगर हिरावाडी) हे गुरूवारी (दि.३०) जेजूरकर मळयाकडून संभाजीनगर नाक्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना मिर्ची हॉटेल सिग्नल परिसरात औरंगाबादकडून भरधाव येणा-या एमएच १५ एचयू ८४४६ या मालट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पोहरकर याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शमुवेल हिवाळे (रा.मनमाड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
दुकानात शिरून व्यावसायीकास बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गावात गोडावून खाली करण्याच्या कारणातून चार जणांच्या टोळक्याने दुकानात शिरून एका व्यावसायीकास बेदम मारहाण केली. या घटनेत व्यावसायीक जखमी झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रशांत जाधव व सागर कोकणे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांची दोन अनोळखी साथीदार अद्याप फरार आहेत.
याप्रकरणी पुंडलीक रामचंद्र जाधव (६८ रा.पिंपळगाव खांब,ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव यांचे देवळाली गावात वसुंधरा फर्टीलायझर व सीडस प्रा.लि.नावाचे दुकान आहे. मंगळवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास ते आपला व्यवसाय सांभाळत असतांना टोळक्याने दुकानात शिरून तुम्ही गोडावून का खाली करत नाही या कारणातून शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. या घटनेत जाधव जखमी झाले असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.