नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २२ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घराते गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील कैलासनगर भागात घडली. मनिषा पुंडलिक अस्वले (रा.साई मंदिरामागे, कैलासनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. अस्वले या विवाहीतेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अस्वले या महिलेने गुरूवारी (दि.३०) अज्ञात कारणातून आपल्या राहते घरात लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिस शिपाई लिलके यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आव्हाड करीत आहेत.
बेकायदा मद्यविक्री करणा-या दोघां दारूविक्रेत्यांवर कारवाई, देशी दारुचा साठा जप्त
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा मद्यविक्री करणा-या दोघां दारूविक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करुन देशी दारूचा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड व अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई औद्योगीक वसाहतीतील घरकुल योजना भागात उघडकीस आली. सिकंदर लक्ष्मण जाधव (३२ रा.घरकुल योजना) हा लहूजीनगर भागातील एका पत्र्यांच्या शेडमागे बेकायदा देशी दारू करतांना मिळून आला. ही कारवाई गुरूवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास अंबड पोलिसांनी केली. शिपाई अमिर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
दुसरी कारवाई शिंदेगावातील डॉ.गुप्ता यांच्या दवाखाना जवळ करण्यात आली. या परिसरात राजरोसपणे दारू विक्री होत असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली होती. बुधवारी (दि.२९) रात्री पोलिसांनी छापा टाकला असता सचिन अर्जुन पवार (रा.शिंदेगाव ता.जि.नाशिक) हा बेकायदा दारूविक्री करतांना आढळून आला. संशयित पोलिसांची चाहूल लागताच मुद्देमाल सोडून पसार झाला असून या ठिकाणी पोलिसांच्या हाती सुमारे ७०० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या लागल्या आहेत. याप्रकरणी शिपाई मनोहर कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक ठेपणे करीत आहेत.