नाशिक : सासरच्या मंडळीने विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात सासरच्या नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करीत विवाहीतेचे स्त्रीधन बळजबरीने काढून घेतल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी सद्दाम खान,समिना खान,असलम खान,फहीम खान, जेबा खान,कामरान खान व फलक खान (रा.सर्व मिलतनगर,श्रीरामपूर),नणंद शबनम शेख व जाबीर शेख (रा.अष्टगाव ता.राहता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. विवाहीतेने दिलेल्या तक्रारीनुसार ३ मे २०१५ रोजी सद्दाम खान याच्याशी तिचा विवाह झाला. नव्याचे नऊ दिवस संपताच घर घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून तिला मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. त्यातच लग्नास अनेक वर्ष उलटूनही मुलबाळ झाले नाही यावरून छळ वाढला. सासरच्या मंडळीकडून रोज या ना त्या कारणातून तिला मारझोड होवू लागली. सप्टेंबर २०२० मध्ये संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करीत तिच्या अंगावरील स्त्रीधन बळजबरीने काढून घेत परस्पर विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.









