नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर मार्केट ट्रेंडिगच्या नावाखाली लाखोंची फसवणुक करण्यात आल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश विनोद सुर्यवंशी (रा.लासलगाव ता.निफाड) व ईशा जैस्वाल अशी संशयित फसवणूक करणा-यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रदिप नामदेव मंडळ (४५ रा.सातमाऊली चौक,श्रमिकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
संशयितांनी नाशिक पुणे रोडवरील बोधलेनगर भागात असलेल्या जमिन अपार्टमेंट येथे आपले शेअर मार्केट ट्रेडींगचे कार्यालय थाटले होते. या ठिकाणी तक्रारदार सुर्यवंशी यांचे जाणे येणे होते. दोघा ठकबाजांनी शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी येणा-या गुंतवणुकदारांना आपल्या कंपनीत गुंतवणुक केल्यास अकरा महिन्यात दामदुप्पट रक्कम मिळेल असे आमिष दाखविल्याने ही फसवणुक झाली.
संशयितांच्या आमिषाला बळी पडत तक्रारदार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी गेल्या वर्षी ४ मार्च ते २७ मार्च दरम्यान तब्बल वीस लाख रूपयांची गुंतवणुक केली. मात्र गुंतवणुकीची रक्कम अथवा दामदुप्पटची रक्कम हाती न पडल्याने फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शर्माळे करीत आहेत.