नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील सिमेन्स कंपनी जवळ व्यावसायीकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. व्यावसायीकाच्या भाच्याने जाब विचारल्याने टोळक्याने हा हल्ला केला आहे. याप्रकरणी धनंजय साहेबराव दातीर (रा.आनंद अपा.अंबडगाव) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विन साळवे, अशोक साळवे, रवी गवई व अन्य एक साथीदार अशी संशयितांची नावे आहे.
तक्रारदार दातीर यांचे मामा ज्ञानेश्वर किसन वारूंगसे हे या हल्यात जखमी झाले आहेत. वारूंगसे यांचा सिमेन्स कंपनी समोरील आर.पी.स्विटसे बाजूला टपरी असून रविवारी (दि.२६) ते आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. संशयितांनी वारूंगसे यांच्या दुकानात काही वस्तूंची खरेदी केली. त्यानंतर पैसे न देता संशयित दमदाटी करीत निघून जात असतांना शेजारीच हार्ड वेअरचा व्यवसाय असलेल्या तक्रारदाराने संबधीतांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता ही घटना घडली. संतप्त टोळक्याने दातीर यांना मारहाण केली.
दातीर यांनी कशीबशी सुटका करून घेत वेळीच आपला जीव वाचविण्यासाठी धुम ठोकली असता संशयितांनी धारदार कोयता हातात घेवून त्यांचा पाठलाग केला. दातीर पसार झाल्याने संशयितांनी वारूंगसे यांच्याकडे आपला मोर्चा वळवित हार्ड वेअरच्या दुकानात शिरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत वारूंगसे गंभीर जखमी झाले असून, या टोळक्याने हल्यानतर आरडाओरड करून हातात शस्त्र घेवून परिसरात दहशत माजविली. तसेच टोळक्याने परिसरातील दुकानावर दग़डफेक केली. त्यामुळे काही काळ या भागात भितीचे वातावरण पसरले होते. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.