भरदिवसा घरफोडी; पावणे दोन लाखाचा ऐवज चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखा चोरुन नेल्याची घटना पंचवटीतील जुना आग्रारोड भागात घडलीय या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे लंपास केले. या घरफोडी प्रकरणी शाम शिवाजी गोवर्धने (२७ रा.वैद्य अपा.रॉयल सिरॅमिकच्या बाजूला) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवर्धने कुटुंबिय शुक्रवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसात त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ८१ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.
४० हजार रूपये किमतीचा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त, एकास अटक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भद्रकाली पोलिसांनी ४० हजार रूपये किमतीचा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त करुन एकाला अटक केली आहे. स्वप्निल संजय गांगुर्डे (२९ रा.सप्तशृंगीनगर,नांदूरगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
टाकळीरोडवरील शंकरनगर भागात एकाच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भद्रकाली पोलिसांनी सारंग वाईन शॉप भागात संशयितास ताब्यात घेत तपासणी केली असता त्याच्या कडे प्लॅस्टीकच्या गोणीत सुमारे ३९ हजार ३६ रूपये किमतीचा विविध कंपनीची पान मसाला व सुगंधी तंबाखूचे पुडे आढळून आले.
याप्रकरणी पोलिस शिपाई संदिप भाबड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.