नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील ब्रीजखाली रिक्षातून प्रवास करत असतांना औरंगाबाद येथील महिलेची पर्स उघडून सहप्रवासी असलेल्या महिलेने सुमारे सव्वा लाख रूपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केले. या चोरीप्रकरणी संजय यशवंतराव देशमुख (रा.बजाजनगर,वाळूंज एमआयडीसी संभाजीनगर) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबई नाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुख दांम्पत्य गेल्या शुक्रवारी (दि.१७) नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. ठक्कर बाजार बसस्थानकातून देशमुख दांम्पत्य पाथर्डी फाटा येथे जाण्यासाठी रिक्षा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. रिक्षात बसलेल्या भामट्या दोन महिलांनी देशमुख यांच्या पत्नीस बोलण्यात गुंतवून त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले ३० ग्रॅम वजनाचे १ लाख २० हजार रूपये किमतीचे गंठण हातोहात लांबविले. सदर महिला मुंबईनाका परिसरातील ब्रीज खाली अचानक उतरून निघून गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अधिक तपास पोलिस नाईक बिरारी करीत आहेत.
२० वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २० वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना नवीन आडगाव नाका भागात घडली. मनोज बाळू आहिरे (रा.पाट कॉलनी झोपडपट्टी,विजयनगर नवीन आडगावनाका) असे मृत युवकाचे नाव आहे. आहिरे याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनोज आहिरे या युवकाने शुक्रवारी (दि.२४) आपल्या राहत्या घरातील अडगळीस दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत रवी आहिरे यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक खाजेकर करीत आहेत.