हॉटेलच्या स्टोअररूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी सिलेंडरच्या टाक्या चोरल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम भागात हॉटेलच्या स्टोअररूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी सिलेंडरच्या टाक्या चोरून नेल्या. याप्रकरणी रवी संतोष गुप्ता (रा.अनुसयानगर,टाकळीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
गुप्ता यांचे अमृतधाम भागात मधुबन नावाचे हॉटेल आहे. गेल्या मंगळवारी (दि.२१) रात्री ही घटना घडली. गुप्ता यांच्यासह कर्मचारी रात्रीच्या वेळी हॉटेल बंद करून आपआपल्या घरी गेले असता चोरट्यांनी बंद हॉटेलच्या स्टोअररूमच्या दरवाजाचे लॉक तोडून आतील सुमारे दहा हजार रूपये किमतीच्या सिलेंडरच्या टाक्या चोरून नेल्या. अधिक तपास हवालदार धनरवडे करीत आहेत.
बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री करणा-या एकास पोलिसांनी केली अटक
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम परिसरातील बिडीकामगारनगर भागात बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री करणा-या एकास पोलिसांनी अटक केली. या संशयिताच्या ताब्यातून सुमारे ४४ हजार रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन सुधाकर कटारे (२३ रा.घर नं. २७ बिडीकामगारनगर) असे संशयिताचे नाव आहे. संशयित मालूबाई किराणा दुकान परिसरात बेकायदा देशी विदेशी दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२३) रात्री पोलिसांनी छापा टाकला असता संशयित बेकायदा दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यात सुमारे ४४ हजार ९० रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस नाईक निलेश काटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक सुरजे करीत आहेत.