नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारच्या विरोधात विनापरवानगी निदर्शने केल्याप्रकरणी कॉगेसच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात न्यायालयाने कॉग्रेसचे नेते राहूल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.
अल्पसंख्याक आघाडीचे हनीफ बशीर, सेवादलाचे वसंत ठाकूर, नगरसेविका वत्सला खैरे, महिला आघाडीच्या स्वाती जाधव, गोरख सोनार, अरूणा आहेर आदींसह चार ते पाच कार्यकर्त्यांचा संशयितामध्ये समावेश आहे. खा.राहूल गांधी यांना गुजरात राज्यातील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. सदर खटल्यात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी या देशात केंद्र शासनाकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप करीत कॉगे्रस कार्यकर्त्यांनी गुरूवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास पोलिस आयुक्तांनी मनाई आदेश जारी केलेले असतांना एमजीरोडवरील कॉग्रेस भवन येथे एकत्रीत येत घोषणाबाजी करून विनापरवानगी निदर्शने केले.
याबाबत हवालदार सुधीर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.