घर खरेदी व्यवहारात २५ लाखाची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घराचे खरेदी करून दिले नाही व पैसे ही परत केले नाही म्हणून इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी भगवान शिवाजी भागवत (५१ रा.कमोद पार्क कमोदनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दिपक रामकृष्ण मेटकर (रा.सुयोजीत लॉन्स, महात्मानगर) असे संशयित नाव आहे. घर विक्रीचे आमिष दाखवून तब्बल २५ लाखास गंडा घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मेटकर याने भागवत यांची भेट घेत आपल्या मालकिचा फ्लॅट विक्री करायचे असल्याची बतावणी केली होती. त्यानुसार भागवत यांनी फ्लॅट खरेदीची इच्छा व्यक्त केल्याने दोघांमध्ये पैशांचा व्यवहार झाला होता. ११ सप्टेंबर २०१९ ते २२ मार्च २०२३ दरम्यान भागवत यांनी संशयितास २५ लाखाची रोकड अदा केली. मात्र संशयिताने फ्लॅटची खरेदी करून दिली नाही. तसेच पैशांसाठी तगादा लावला असता संशयिताने टाळाटाळ केल्याने भागवत यांनी पोलिसात धाव घेतली व मेटकर यांच्या विरुध्द तक्रार केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
गर्दीची संधी साधत २५ हजार रूपये किमतीचे
मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर गावात यात्रेतील गर्दीची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या गळय़ातील सुमारे २५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी सातपुर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजा राजू विटकर (३२ रा.जयप्रकाश नारायण नगर,त्र्यंबकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विटकर बुधवारी (दि.२२) गुढीपाडवा निमित्त सातपूर गावात भरणा-या यात्रेत गेल्या होत्या. देवदर्शन करून यात्रेत त्या खरेदी करीत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे २५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.