नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तिडके कॉलनी भागात कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगेत लॅपटॉपसह, मोबाईल, हेडफोन, स्मार्ट वॉच व पॉवर बॅक चार्जर असा सुमारे ८५ हजाराचा ऐवज होता. या चोरीप्रकरणी विवेक श्रीधर हरणे (रा.दिघी,पुणे) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरणे बुधवारी (दि.२२) कामानिमित्त शहरात आले होते. दुपारच्या सुमारास त्यांनी आपली कार तिडके कॉलनीतील राजभोग हॉटेल समोर पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारच्या खिडकीची काच फोडून पाठीमागील सिटावर ठेवलेली बॅग चोरून नेली. या बॅगेत लॅपटॉप, मोबाईल, हेडफोडन, स्मार्ट वॉच व पॉवर बँक असा सुमारे ८४ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास जमादार केशव आडके करीत आहेत.
दुचाकीस्वार युवतीचा विनयभंग
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुमावतनगर भागात घरासमोर का बसला याबाबत जाब विचारल्याने संतप्त तरूणाने दुचाकीस्वार युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश राजू परदेशी (रा.कर्ननगर पेठरोड) असे संशयित तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कुमावतनगर भागात राहणा-या पीडितेने तक्रार दाखल केली आहे. संशयित मंगळवारी (दि.२१) रात्री पीडितेच्या घरासमोरील मंदिराच्या पाय-यांवर बसलेला होता. दुचाकीवरून आलेल्या तरूणीने त्यास येथे का बसला असा जाब विचारला असता त्याने मोपेडची चावी काढून घेत युवतीचा विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरनार करीत आहेत.