पाय घसरून नदीपात्रात पडल्याने २१ वर्षीय तरूणीचा पाण्यात बुडून मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोमेश्वर धबधबा जवळ पाय घसरून नदीपात्रात पडल्याने २१ वर्षीय तरूणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शिवांगी जयशंकर सिंह (रा.उज्वलनगर,माळेगाव एमआयडीसी सिन्नर) असे मृत तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिवांगी सिंह ही तरूणी सोमवारी (दि.२०) मित्र आदित्य नरेंद्र देवरे याच्यासमवेत शहरात आली होते. दोघेही फिरण्यासाठी सोमेश्वर धबधबा भागात गेले असता ही घटना घडली. सायंकाळच्या सुमारास गोदापात्र परिसरात दोघे फोटो सेशन करीत असतांना अचानक युवतीचा पाय घसरल्याने ती नदीपात्रात पडली.
तरूणाने तात्काळ आरडाओरड केल्याने स्थानिकांसह जीवरक्षकांनी वेळीच धाव घेत तिला पाण्याबाहेर काढले. भाऊ हिमांशू सिंह याने तिला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार देवरे करीत आहेत.
वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडको परिसरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यात एकाने गळफास लावून घेत तर दुस-याने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना सावतानगर भागात घडली. मधुकर गोकूळ खैरनार (४८ रा.अलंकार फोटो स्टुडीओ जवळ,सावतानगर) यांनी गेल्या शनिवारी (दि.१८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. साडू नितीन धिडसे यांनी त्यांना बेशुध्द अवस्थेत तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.
दुसरी घटना चुंचाळे शिवारात घडली. येथील राकेश सुभाष सोनवणे (३४ रा.रेशन दुकान गल्ली,दत्तनगर) यांनी सोमवारी दुपार पूर्वी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पत्र्यांच्या अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत संदिप सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक आवारे करीत आहेत.