नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे पाच लाख लंपास केले. यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना जय भवानी रोड भागात घडली. संकेत श्रीराम पाठक (रा.मनुश्री बंगलो, आडकेनगर नं.१) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाठक कुटुंबिय १७ ते १९ मार्च दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा व कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यात शिरलेल्या चोरल्यांनी लाकडी कपाटात ठेवलेले सुमारे २ लाख ३७ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार व चांदीचे भांडे चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक विकास लोंढे करीत आहेत.
दुसरी घटना हिरावाडीरोड भागात घडली. या घरफोडी प्रकरणी आशिष रमाकांत संधान (रा.शिवधारा रो हाऊस,मोकळबाबानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संधान कुटुंबिय गेल्या बुधवारी (दि.१५) बाहेरगावी गेलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमधील व बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे आणि रोकड असा सुमारे ३ लाख २९ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक वाय.एस.माळी करीत आहेत.