नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोवंश मांसाची बेकायदा वाहतूक करणा-या टेम्पो चालकास पोलिसांनी गजाआड केले आहे. महामार्गावरील गरवारे पॉईंट भागात वाहन तपासणी करीत असतांना गोवंश मास आढळले. याप्रकरणी पोलिसांनी ८ लाख ५० हजार रूपये किमतीचे मांस जप्त असून अंबड पोलिस ठाण्यात प्राणी संरक्षण व गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सय्यद इम्तीयाज सय्यद फयाज (३५ रा.कामील मंजील,चौकमंडई काझीगडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित मांस वाहतूक करणा-या चालकाचे नाव आहे. महामार्गावरून प्राण्यांची कत्तल केलेले मांस वाहतूक केले जात असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.१९) सायंकाळी पथकाने गरवारे पॉईंट भागात नाकाबंदी करीत वाहनतपासणी केली असता संशयितासह मांस पोलिसांचे हाती लागले. लेलंड दोस्त हा एमएच १५ जेसी ०९२३ मालवाहतूक टेम्पो अडवून पथकाने तपासणी केली असता त्यात बंदी असलेले गोवंश मास आढळून आले. संशयित चालकास ताब्यात घेत पोलिसांनी प्राणी कत्तलीचे मांस व टेम्पो असा सुमारे ८ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अंमलदार दिनेश नेहे यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पवार करीत आहेत.