नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर – नाशिक रोडवर दुभाजक तोडून धावत्या बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारापाठोपाठ जखमी तरूणीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आकांक्षा ज्ञानेश्वर जाधव (२१ रा.आनंदवली,गंगापूररोड) असे मृत तरूणीचे नाव आहे. गेल्या शनिवारी त्र्यंबकरोडवरील बेळगाव ढगा फाटा परिसरात झाला होता. गेली आठ दिवस आकांक्षावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुणे येथून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी निघाललेली श्रीराम ट्रव्हल्स कंपनीची बस एमएच ४७ एएस ४८४८ गेल्या शनिवारी सकाळच्या सुमारास त्र्यंबक येथून नाशिकच्या दिशेने येत असतांना हा अपघात झाला होता. बेळगाव ढगा फाटा येथील एस्पॅलिअर स्कूलजवळ अचानक बसचे टायर फुटल्याने बस डिव्हायडर तोडून दुस-या लेनमध्ये येवून झाडाला धडकली होती. या अपघातात नाशिकहून त्र्यंबकच्या दिशेने जाणा-या अॅक्टीव्हा एमएच ४१ बीजे २३६३ व टिव्हीएस स्पोर्ट एमएच १५ इजे ५६९५ या दुचाकीस्वारांना बसने उडविले होते.
त्यात केटीएचएम विद्यालयाचा ओम देवेंद्र तासकर (२१) हा तरूण जागीच ठार झाला होता. तर त्याच्या पाठीमागे बसून डबलसिट प्रवास करणारी आकांक्षा जाधव ही युवती गंभीर जखमी झाली होती. डोक्यास व हाता पायास गंभीर दुखापत झाल्याने तिला महात्मानगर येथील सिक्स सिग्मा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली आठ दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतांना रविवारी (दि.१९) डॉ. अनिस खान यांनी तिला मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक आर.एस.वाघमारे करीत आहेत.