नाशिक : महामार्गावरील समर्थनगर बस थांबा भागात रस्त्याने फोनवर बोलत जाणा-या व्यक्तीच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. मोबाईल हिसकावल्यानंतर चोरट्यांचा पाठलागही केला गेला. पण, चोरट्यांनी पोबाराला केला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन विश्वनाथ खरे (४५ रा.जत्रा हॉटेल मागे,स्वामी समर्थ नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खरे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास महामार्गावरील समर्थ नगर बस थांबा भागातून रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. मदर तेरेसाकडे जाणा-या मार्गाने ते फोनवर बोलत जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून हिरावाडीच्या दिशेने पोबारा केला. मात्र खरे यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरीक त्यांच्या मदतीला धावून आले. भामट्यांचा पाठलाग करीत असतांना संशयितांची दुचाकी घसरली. या घटनेत नागरीक पकडतील या भितीतून संशयित दुचाकी सोडून पसार झाले असून त्यांनी खरे यांचा दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल घेवून पलायन केला आहे. संशयितांनी सोडलेली दुचाकीही चोरीची असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर करीत आहेत.