नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात शुक्रवारी वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये चार तरूणांचा मृत्यू झाला. त्यात तीन दुचाकीस्वार व एका पादचारी कारखाना कामगाराचा समावेश आहे. याप्रकरणी भद्रकाली, सातपूर, उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिला अपघात जुने नाशिक भागात घडला. ऋषीकेश विजय दमक (२५ रा. बळी मंदिर,के.के.वाघ कॉलेज मागे) हा तरूण शुक्रवारी सायंकाळी कथडा भागातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत होता. महापालिकेच्या डॉ.जाकिर हुसेन हॉस्पिटल भागात भरधाव दुचाकी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जावून आदळल्याने तो गंभीर जखमी झाला होता. मित्र मयुर पाटील याने त्यास तात्काळ मुंबईनाका भागातील नाईन पल्स हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.दिनेश वाघ यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत डॉ.सुरेखा धांडे यांनी दिलेल्या खबरीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक रेहरे करीत आहेत.
अपघाताची दुसरी घटना सातपूर औद्योगीक वसाहतीत घडली. शुभम यशवंत बच्छाव (१९ रा.श्रमिकनगर,सातपूर) हा कामगार शुक्रवारी नेहमी प्रमाणे कंपनीत कामास गेला होता. सायंकाळच्या सुमारास सुट्टी झाल्याने तो कंपनीतून घराकडे पायी जात असतांना हा अपघात झाला. अशोकनगर परिसरातून तो पायी जात असतांना सीएट कंपनी परिसरात भरधाव एमएच १५ जेसी ०५८७ या टेम्पोने त्यास धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने चुलत भाऊ सचिन बागले यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पुष्पा बहिरम यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पो चालक रोहिदास रामदास वाघ याच्याविरूध्द सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.
तिसरा अपघात संजीवणी मल्टी सर्व्हीसेस जवळ झाला. आकाश सुभाष जवळेकर (२५ रा.श्रमिकनगर,कॅनलरोड ना.रोड) हा युवक गुरूवारी (दि.१६) रात्री आपल्या दोघा मित्रांसमवेत दुचाकीवर ट्रिपलसिट जेवणासाठी हॉटेलमध्ये जात असतांना हा अपघात झाला. कॅनलोरोडने तिघे मित्र इच्छामणी शाळेच्या पाठीमागून प्रवास करीत असतांना संजीवणी मल्टी सर्व्हीसेस येथे पी.एल.आडके या कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या खोदकामास लोखंडी पाईप आडवे लावण्यात आल्याने दुचाकी पाईपास धडकली. या अपघातात तिघे मित्र जखमी झाले होते. त्यातील जवळेकर यास प्रथम जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव मेडीकल कॉलेज येथे हलविण्यात आले असता डॉ.अथर्व चौखडे यांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी दुचाकीचालक राजेश स्वामी नामक मित्राने उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ठेकेदाराविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक घोटेकर करीत आहेत.
चौथा अपघात चांदगिरी कॅनल भागात झाला. कोटमगाव ता.जि.नाशिक येथील शेखर राजू पगारे (२७) हा युवक शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोटमगाव येथून आपल्या दुचाकीने नाशिकरोडच्या दिशेने प्रवास करीत होता. चांदगिरी कॅनल भागात भरधाव दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. भाऊ अंबादास पगारे यांनी त्यास तात्काळ मॅग्नम मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉ. राहूल बिली यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत डॉ. संदीप गुप्ता यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.