मेव्हण्याने वापरण्यासाठी घेतलेली कारची परस्पर लावली विल्हेवाट, गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेव्हण्याने वापरण्यासाठी घेतलेली कारची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मेव्हण्यासह एका विरूध्द अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेव्हण्याने नातेवाईकाच्या मदतीने कार विक्री केल्याचा अंदाज मुळमालकाने वर्तविला असून, याप्रकरणी अमित दिलीप कुलकर्णी (३५) व अभय जोशी अशी कारचा अपहार करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी हेमंत लक्ष्मण सोनवणे (रा.संत नरहरीनगर, जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे यांचे कुलकर्णी हे मेव्हणे असून दुसरा संशयित जोशी हा कुलकर्णी यांच्या बहिणीचा पती आहे.
सोनवणे यांची हुंडाई आय २० कार गेल्या वर्षी २० जानेवारी रोजी संशयित मेव्हणा कुलकर्णी याने वापरण्यासाठी नेली होती. सदर कार कुलकर्णी याने त्याचा मेव्हणा जोशी याच्याशी संगनमत करून परस्पर त्रयस्त व्यक्तीच्या स्वाधिन केली असून संबधितांनी कार विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोनवणे यांनी अनेकवेळा कारची मागणी करूनही संशयितांनी कार परत करण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक काकड करीत आहेत.
तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना जयभवानीरोड जवळ घडली. याप्रकरणी अरबाज शौकिल शेख (२५ रा.कदम लॉन्स जवळ,भालेराव मळा) या युवकाने तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज शेख बुधवारी (दि.१५) रात्री परिसरातील मेडीकल स्टोअर्सवर आईसाठी गोळय़ा औषधे घेण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. जयभवानी रोडवरील कदम लॉन्स समोरून तो मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. या घटनेत मोबाईलसह कव्हरमध्ये ठेवलेले चार हजार रूपयांची रोकड असा सुमारे १९ हजार रूपयांचा ऐवज भामट्यांनी लांबविला असून अधिक तपास उपनिरीक्षक विकास लोंढे करीत आहेत.