नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतनगर येथे वीज बिलाची थकीत वसूली करण्यासाठी गेलेल्या कर्मचा-यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत डोके भिंतीवर आपटल्याने कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इरशान इब्राहिम पठाण (३३),रोजशीन इरशान पठाण (३०) व त्यांचे मुले (रा.सर्व पॉवर हाऊसमागे,भारतनगर) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी वैभव अनिल कांडेकर (रा.इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
कांडेकर वीज कंपनीचे कर्मचारी असून ते आपल्या सहका-यांना सोबत घेवून बुधवारी (दि.१५) वीज बिलाची थकबाकी वसूलीसाठी भारतनगर येथील नऊ नंबर गल्लीमध्ये गेले असता ही घटना घडली. थकित बिलाची वसूली भरण्यास सांगितल्याने दोघा संशयितांसह त्यांच्या मुलांनी कांडेकर यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी व प्लॅस्टीकच्या पाईपाने मारहाण केली.
या घटनेत कांडेकर यांचे डोके भिंतीवर आपटण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी सरकारी कामात अडथळासह विवीध कलमान्वये पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.