नाशिक : पहिने बारीत धिंगाणा घालणा-या आठ जणांवर पोलिसांनी कारवाई करुन त्यांना अटक केली आहे. शनिवारी दोन गटात एकमेकांना भिडल्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याची दखल घेत वाडिव-हे पोलिसांनी दोन्ही गटावर ही कारवाई केली आहे. अटक केलेल्यांमध्ये नरेश कसबे (वय २८), गोकुळ मोंढे (३१), शुभम कापडणीस (२१), राहुल गारगुंडे (२७) आणि महेश गिदाड (२७), रवी दिवे (२५), विजय मोढे (२१), गुलाब दिवे (२२) यांची नावे आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास नेकलेस फॉलजवळ ओझरखेड आणि सातपूर कॉलनीतील तरूणांमध्ये हाणमारी झाली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिस अंमलदार अमोल अंभोरे हे सेवा बजावत असताना त्यांनीही हा प्रकार पाहिला होता. या घटनेच्या वेळी अधिकची कुमक मागवून संशयितांना ताब्यातही घेण्यात आले होते. पहिने बारीसह इतरत्र जाण्यास अजूनही मनाई असून धिंगाणा घालणा-यांना त्वरित ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी दिली आहे.