नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रेडीट कार्डचा गैरवापर करुन परस्पर सुमारे ७५ हजाराची ऑनलाईन खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष दत्तात्रेय कदम (५१ रा.शितळादेवी मंदिरामागे,पळसे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कदम यांच्यानावे एसबीआय बँकेचे क्रेडीट कार्ड असून रविवारी (दि.१२) सकाळच्या सुमारास ते नाशिक – पुणे रोडवरील चेहडी भागात असलेल्या ओंकार मोटार ट्रक गॅरेजमध्ये असतांना अज्ञात भामट्यांनी त्यांच्या क्रेडीट कार्डचा गैरवापर करीत फ्लिपकार्डच्या माध्यमातून सुमारे ७४ हजार ५९ रूपयांची परस्पर ऑनलाईन खरेदी केली.
कदम यांच्या मोबाईलवर एका पाठोपाठ मॅसेज आल्याने ही घटना उघडकीस आली असून अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत.