३२ वर्षीय विवाहीतेवर बळजबरीने बलात्कार; परप्रांतीय पंक्चर व्यावसायीकाला पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३२ वर्षीय विवाहीतेवर बळजबरीने बलात्कार करणा-या परप्रांतीय पंक्चर व्यावसायीकाला पोलिसांनी गजाआड केले आहे. इंद्रजीत रामानंद प्रसाद (२७ रा.बेलमाऊंट अपा.वैश्यंपायन शाळेजवळ,महात्मानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत ३२ वर्षीय पीडित विवाहीतेने तक्रार दाखल केली आहे. संशयिताचा एबीबी सर्कल भागात पंक्चरचा व्यवसाय असून त्यामुळे विवाहीतेचे त्याच्याकडे जाणे येणे होते. यातून दोघांमध्ये ओळख निर्माण झाली. बुधवारी (दि.१५) दुपारी पीडिता संशयिताच्या दुकानावर गेली असता त्याने आपले घर बघावे यासाठी विवाहीतेकडे आग्रह धरल्याने ही घटना घडली. महिला संशयितासोबत त्याच्या घरी गेली असता त्याने घराचा दरवाजा लावून घेत महिलेवर बळजबरीने बलात्कार केला. महिलेने कशीबशी सुटका करून घेत पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महेश येसेकर करीत आहेत.
दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सव्वा दोन लाखाचा ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास केला आहे. आडगाव शिवारातील कोनार्कनगर भागात ही घरफोडी झाली. यात दोन लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे, कपडे व मोबाईल चोरीला गेले. याप्रकरणी मनोहर बाळनाथ निकम (रा.वासननगर,पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकम यांचे आई वडिल कोनार्कनगर परिसरातील दत्तनगर भागात राहतात. मंगळवारी (दि.१४) निकम यांचे कुटुंबिय बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. राजनंदीनी रो हाऊस या निकम यांच्या आई वडिलांच्या बंद घराचे व त्यांच्या समोर राहणाºया लिना गोरे यांच्या बंगल्याचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व दागिणे असा सुमारे २ लाख ३१ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक तोडकर करीत आहेत.