वेगवेगळया तेरा बँकाच्या २४ खात्यांमधून रक्कम वर्ग
करुन दोघांनी वृध्दास ८१ लाखाला गंडा घातला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया तेरा बँकाच्या २४ खात्यांमधून रक्कम वर्ग करुन दोघांनी वृध्दास तब्बल ८१ लाखाला गंडा घातला आहे. अंकितकुमार सक्सेना आणि राधाकृष्णन पिल्लई अशी फसवणूक करणा-या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी देविदास त्रिविक्रम मुळे (७४ रा. बापू बंगल्याजवळ,इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे परिचीत असून संशयितांनी वृध्द तक्रारदाराच्या असाह्यतेचा फायदा उचलत १ सप्टेंबर २०११ ते १४ मार्च २०२३ दरम्यान हा गंडा घातला आहे. गेल्या बारा वर्षात संशयितांनी इन्शुरन्सचे हप्त्यापोटी भरलेले पैसे परत मिळवून देतो व लॉटरीत फ्लॅट मिळाला असून तो नको असेल तर त्याचे पैसे परत मिळवून देतो असे आमिष दाखवून हा गंडा घातला असून कधी कधी ट्रक्स व फाईल करण्याचा बहाणा करून तसेच भुलथापा देवून भामट्यांनी वृध्दाच्या तेरा बँकामधील वेगवेगळया २४ खात्यामधून ८१ लाख २९ हजार ८८० रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली आहे.
त्यात स्टेट बॅक, देना बँक, येस बँक, एचडीएफसी बँक, सेट्रल बँक, आयसीआयसीआय बँक, पटियाला बँक, बँक ऑफ इंडिया, आसीबी आयडीएफसी, कॅनरा, एयू स्माल फायनान्स बँक व बंधन बॅकेचा समावेश आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक वांजळे करीत आहेत.
इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर मधील
कॉपर पट्या चोरणार चोर गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीज कंपनीच्या कर्मचा-यांनी इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर मधील कॉपर पट्या चोरणा-या चोरास पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. या चोरास पोलिसांनी अटक केली आहे. बाळू श्रावण दिवे (४८ रा.एरिगेशन कॉलनी,मखमलाबाद) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी याप्रकरणी वीज कंपनीचे राकेश घुगे यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घुगे मंगळवारी (दि.१४) त्यांच्या सहका-यांसमवेत सहवास नगर येथील विद्यूत तक्रार निवारण केंद्रातील काम आटोपून शरणपूर रोड येथील आपल्या ऑफिसमध्ये जात असतांना ही घटना उघडकीस आली. शासकिय विश्रामगृहा समोरून ते आपल्या वाहनातून प्रवास करीत असतांना वीज कंपनीच्या मधुबन बंगल्या शेजारील इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर जवळ त्यांना संशयित आढळून आला. कर्मचा-यांनी धाव घेत पाहणी केली असता ट्रान्सफार्मचे डिस्ट्रीब्युशन बॉक्सचा दरवाजा उघडून संशयित कॉपर पट्या चोरतांना मिळून आला. अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.