पूर्ववैमनस्यातून तरूणाच्या अंगावर चारचाकी घालून
जीवे मारण्याचा प्रयत्न, संशयित गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव खांब ते वडनेररोडवर घडला पूर्ववैमनस्यातून तरूणाच्या अंगावर चारचाकी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी संशयित चारचाकी चालकास अटक केली आहे. सुनिल राजाराम सोनवणे (रा.पिंपळगाव खांब ता.जि.नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तरूणाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने तो बालंबाल बचावला आहे.
याप्रकरणी निरंजन दत्तू जाधव (२३ रा.भवानीनगर,पिंपळगाव खांब ता.जि.नाशिक) या युवकाने तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आणि तक्रारदार यांच्यात पूर्ववैमनस्य असून जाधव मंगळवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास पिंपळगाव खांब ते वडनेररोडने आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली.
जाधव परिसरातील गणेश पाटील यांच्या घरासमोरून पायी जात असतांना पाठीमागून भरधाव चारचाकी घेवून आलेल्या संशयिताने जाधव यांना जीवे ठार मारण्याच्या उदेशाने वाहन अंगावर घातले. मात्र तत्पूर्वीच जाधव यांनी प्रसंगावधान राखत पाटील यांच्या घराकडे धाव घेतल्याने तो बालंबाल बचावला असून एवढ्यावरच न थांबता संशयिताने आपले वाहन थांबवून जाधव यांना शिवीगाळ करीत तुला व तुझ्या चुलत भावांना बघून घेईल अशी धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.
१८ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १८ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना भगूर येथील स्मशानभूमी भागातील एका रूममध्ये घडली. अनमोल प्रकाश सोनवणे (१८ रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक राजवाडा भगूर) असे मृत युवकाचे नाव आहे. सोनवणे याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनमोल सोनवणे याने मंगळवारी (दि.१४) भगूर गावातील स्मशानभूमी भागात असलेल्या एका रूममध्ये गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियाने त्यास तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गुंजाळ करीत आहेत.