नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टिम ह्युअर नावाचे रिमोट अॅक्सेस अॅप डाऊन लोड करण्यास भाग पाडून एका वीज ग्राहकाला सव्वा दोन लाखाला गंडा घातला आहे.
ऑनलाईन वीज बिल भरण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिम ह्युअर नावाचे रिमोट अॅक्सेस अॅप डाऊन लोड करण्यास भाग पाडून भामट्यांनी ही रोकड लांबविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सबा कौसर मोहम्मद वसीम शेख (रा.हॅपी होम कॉलनी,आनंदनगर अशोका मार्ग) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या १७ जानेवारी रोजी ९१८९८७५३२६८१ व ०६२९०१४९६३६ या मोबाईलधारी भामट्यांनी शेख यांच्याशी संपर्क साधला होता. वीज वितरण कंपनीतून बोलत असल्याचे भासवून त्यांनी थकीत वीज बिल भरण्यासाठी टिम ह्युअर नावाचे रिमोट अॅक्सेस अॅड डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
या काळात भामट्यांनी शेख यांच्या मोबाईल फोनचा अॅक्सेस प्राप्त करून तसेच इंटरनेट बँकीगचा आयडी पासवर्ड मिळवून त्यांच्या बँक खात्यातील २ लाख १३ हजार ४९९ रूपयांची रोकड परस्पर अन्य खात्यात वर्ग करून लांबविली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक बिजली करीत आहेत.
तलवार घेवून दहशत माजविणा-या
गावगुंडावर पोलिसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तलवार घेवून दहशत माजविणा-या गावगुंडावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेत कामटवाडा परिसरातील माऊली लॉन्स भागात संशयितांच्या ताब्यातून धारदार तलवार हस्तगत करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षास स्थानिकांनी कळविल्याने ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम बापूराव देवरे (४३ रा.गौरीनंदन आर्केड,मटाले मंगल कार्यालयाजवळ,कामटवाडे) असे संशयित तलवारधारीचे नाव आहे.
मंगळवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास तो माऊली लॉन्स परिसरातील व्ही.के.पाटील शाळा भागात हातात धारदार लोखंडी तलवार घेवून दहशत माजवित होता. नियंत्रण कक्षास याबाबत माहिती कळविण्यात आल्याने पोलिसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत पोलिस नाईक देवेंद्र बर्डे यांच्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक डी.एस.महाजन करीत आहेत.