नाशिक : पळसे येथून वायफायच्या सहाय्याने इलेक्ट्रीक फोर्च्युनर कार पळविणा-या चोराला पोलिसांनी राजस्थान येथील चित्तोडगड भागात पकडून त्याला गजाआड केले आहे. पण, या चोराचे दोन साथीदार अद्याप फरार आहे. या चोराकडून पोलिसांनी कार जप्त केली आहे. सावलाराम बाबुलाल विश्नोई (२३ रा.गलीफा – सांचोर जि.जारोर,राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या चोराचे दोन साथीदार मुकेश खिलेरी व सुरेश खिलेरी (रा.दोघे सदर) हे मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही. पळसे येथील पांडूरंग संपत एखंडे यांची सुमारे ३५ लाख रूपये किमतीची फॉरच्युनर कार गेल्या शुक्रवारी रात्री चोरीस गेली होती. त्यानंतर पोलिसांनी या चोरीचा शोध घेऊन कार चोरला पकडले आहे.
नाशिकरोडचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक घटनास्थळावरील सीसीटिव्हीच्या माध्यमातून या चोरीचा शोध घेतला. त्यांना ही कार धुळे मार्गे मध्यप्रदेश अथवा राजस्थानामध्ये गेल्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोन्ही राज्याताली पोलिसांशी नियमीत संपर्क साधून पाठपुरावा केल्याने कारसह चोरटा हाती लागला. ही कारवाई पथकाचे सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे,हवालदार अनिल शिंदे, पोलिस नाईक अविनाश देवरे, पोलिस नाईक विष्णू गोसावी, विशाल पाटील, शिपाई मनोहर शिंदे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, केतन कोकाटे, कुंदन राठोड, संदिप बागल आदींच्या पथकाने केली.या चोराने लॅपटॉपच्या वायफायच्या माध्यमातून कार पळविल्याची कबुली दिली आहे.