नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे तीन लाखाचा ऐवज लंपास केला. परबनगर भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल अरूण कुलकर्णी (रा.ओमकार अपा.शिवओम हॉस्पिटल समोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी कुटुंबिय शनिवारी (दि.११) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॅचलॉक उचकटून घरात प्रवेश केला व बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे तसेच देवघरातील चांदीच्या समई, दिवे आणि चांदीचे शिक्के असा सुमारे २ लाख ९६ हजार १०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.