वृक्ष तोड केल्याप्रकरणी जागा मालकाविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डीजीपीनगर येथील के.के.वाघ शाळा भागात खासगी जागेतील वृक्ष तोड केल्याप्रकरणी जागा मालकाविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोजकुमार लाडाणी (रा.क्रिशग्रुप.उपनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जागा मालकाचे नाव आहे. या घटनेत लाडाणी यांनी कुठलीही परवानगी न घेता तीन बाभळीचे झाडे बेकायदा तोडली त्यामुळे त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी महापालिकेचे सचिन रामदास देवरे (रा.पंडीत कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. लाडाणी यांचा डीजीपीनगर येथील के.के.वाघ शाळे समोर मोकळा भूखंड आहे. या खासगी जागेतील तीन काटेरी बाभळीचे झाडे संशयिताने परवानगी न घेता मुळासकट तोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. ही मुलगी पंचशिलनगर भागात राहणारी आहे. तिच्या पालकांनी तिला कुणी तरी फुल लावून पळवून नेल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजाभवानी मंदिर परिसरातील मुलगी गुरूवारी (दि.९) दुपारच्या सुमारास कामाचे पैसे घेवून येते असे सांगून घराबाहेर पडली ती अद्याप परतली नाही. दोन दिवस उलटूनही ती घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. कोणी तरी फुस लावून तिला पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.