नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वीर मिरवणुकीत धारदार कोयता बाळगणा-या पाच जणांवर पंचवटी पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश कैलास काथवटे (१८ रा.कुंभारवाडा काझीगडी), अशोक हनुमंता माळी (१९ रा.निर्मला कॅन्व्हेंट शाळेजवळ,विद्या विकास सर्कल),विशाल अरूण शेवरे (२२ पंचशिलनगर,गंजमाळ), आनंद मंगल भोई (१८ रा.शितळा देवी मंदिरामागे,काझीगडी) व रोहित बापू थोरात (१८ रा.महालक्ष्मी चौक,पवननगर,सिडको) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
राज्यभरात धुळवडीचा उत्सव साजरा केला जात असतांना नाशिकमध्ये मात्र या दिवशी वीरांना नाचविण्याची अनोखी परंपरा आहे. तिनशे वर्षांची ही परंपरा आजही कायम असून मंगळवारी (दि.७) गंगाघाटावरील म्हसोबा पटांगणावर पार पडली. मानाच्या आणि नवसाला पावणा-या दाजीबा वीरांच्या मिरवणुकीला यंदा भाविकांची मोठा प्रतिसाद लाभला. या मिरवणुकीस कुठलाही गालबोट लागू नये यासाठी पोलिस यंत्रणेने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. उपद्रवींची या ठिकाणी झडती घेण्यात आली असता संशयित कोयताधारी पोलिसांच्या हाती लागले. संशयितांच्या ताब्यातून कोयत्यांसह सुरा जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस शिपाई साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस कर्मचारी नाईक करीत आहेत.