नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकीवर बेकायदा मद्यविक्री करणा-यावर पोलिसांनी कारवाई करत त्याच्या ताब्यातून दुचाकीसह मद्यसाठा असा सुमारे ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विशाल राजेंद्र पाटील (३३ रा. गंगासागर नगर शिवाजीनगर,सातपूर) असे संशयित मद्यविक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औद्योगीक वसाहतीतील अंबड लिंक रोड भागात असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोलपंप भागात दुचाकीवर मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पोलिसांनी सापळा लावला असता एमएच १७ सिए ०९९३ वरील संशयित दुचाकीस्वार दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यात प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून या कारवाईत दुचाकीसह मद्यसाठा असा सुमारे २९ हजार ८६० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई जनार्दन ढाकणे यांनी तक्रार दिली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.